
सेलू : तालुक्यातील कोटंबा येथे शिक्षक दिनाच्या औचित्यावर कोरोना योद्ध्यांसह स्थानिक शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रभाकर वनकर तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच रेणुका कोटंबकार, उपसरपंच अरविंद तुमडाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रविंद्र कोटंबकार यांच्यासह ग्रा.पं. सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कोरोना काळात गावात अविरत सेवा देणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकारी दिक्षा थुल, आरोग्य सेविका सुनिता वाढवे, आरोग्य सेवक नरेश ढवळे, अंगणवाडी सेविका शोभा चिडाम, आशा वैशाली रघाटाटे, नोडल अधिकारी राजेश मन्ने यांच्यासह जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर वनकर, शिक्षक अरविंद वैद्य, खंडाळे आदिंचा पुस्तक व सन्मानपत्र भेट देत सरपंच रेणुका कोटंबकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यासोबतच इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षेत प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी अश्रुती राऊत, कल्याणी ढुमणे, आदित्य धवड, प्रथमेश वांदिले, साहिल सरोकार, आयुष सावरकर, रोहित भलावी आदिंचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र भेट देत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य रंजना राऊत, सिमा कांबळे, कुंदा फुन्ने यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सागर राऊत यांनी तर आभार ग्रा.पं. कर्मचारी अशोक कांबळे यांनी मानले.