

वर्धा : भारतीय रेल्वेच्या माल गुदाम नागपूर विभागात पर्यवेक्षक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून उच्चशिक्षित युवकाला १ लाख १५ हजार रुपयांना गंडविल्याचा प्रकार गोंडप्लाॅट परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
राजेंद्र पूनमचंद दुबे याने बी. ई. अभ्यासक्रमाची पदवी पूर्ण केल्यानंतर तो नोकरीच्या शोधात होता. दरम्यान, त्याची गजेंद्र इंगोले याच्याशी ओळख झाली त्याने दिगांबर थूल आणि संदीप मेश्राम यांच्याशी ओळख करून दिली. तिघांनी त्याला नागपूर विभागात रेल्वे गुदामात पर्यवेक्षक म्हणून नोकरी लावून देतो, त्यासाठी दीड लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
त्यानुसार दीड लाख रुपये युवकाने दिले असता त्याच्याकडून रेल्वेचे बनावट दस्तऐवजावर स्वाक्षर्या घेतल्या, इतकेच नव्हे तर त्यांनी दिनांक नसलेले रेल्वे विभागाचे पत्रही दिले. १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर नोकरी सोडल्यावर १ लाख २५ हजार मिळेल, असे लिहून दिले. मात्र, नोकरी न लागल्याने युवकास संशय आल्याने त्याने आरोपींकडे पैशाची मागणी केली. त्यांनी आधी १० आणि नंतर २५ हजार असे एकूण ३५ हजार रुपये युवकास परत केले. मात्र, त्यानंतर उर्वरित १ लाख १५ हजाराची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने युवकाने याबाबतची तक्रार शहर पोलिसांत दिली आहे.