आर्थिक आमिषाचे मायाजाल! ‘ड्रॅगन’चा फंडा लोन, दुप्पट पैशाचा घातला जातोय गंडा; चिनी ॲप्सचा भूलभुलय्या डोकेदुखी

वर्धा : सातत्याने सायबर क्राईमचे प्रमाण वाढत आहे. तर सर्वाधिक सायबर क्राईम हे चिनी ॲप्सच्या माध्यमातून होत असल्याचे चित्र आहे. कमी व्याजाने कर्ज, पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष अशा अफलातून फसवणुकीचे नवनवीन फंडे काही चिनी ॲप्सच्या माध्यमातून होत आहेत.

जिल्ह्यात अनेकांना असा गंडा बसला आहे. मात्र, याबाबत फारशा तक्रारी होत नाहीत. यातून अशा घटना ‘रेकॉर्ड’वर येत नाहीत. मात्र, ‘ड्रॅगन’ कडून सायबर क्राईमचा विळखा घट्टच होऊ लागला आहे. दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे गोरगरीब, बहुसंख्येने मध्यमवर्गीयांची मानसिकता खचली आहे. कोरोनामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले. अनेकांना कर्जफेडीची चिंता राहिली.

पैशाची चणचण, हाताला काम नाही, यातून आलेल्या अशा गरजूंच्या आर्थिक अगतिकतेचा फायदा तंत्रज्ञानात तरबेज असलेल्या ठग प्रवृत्तींकडून घेतला जातो आहे. आता अनेकांकडे ॲण्ड्रॉईड मोबाईल आहेत. मात्र, यातील अनेक ॲण्ड्रॉईड मोबाईलधारकांना पद्धतशीर गंडा घालणाऱ्या ‘सायबर क्रिमिनल्स’च्या टोळ्या कार्यरत आहेत. अमूक ॲप डाऊनलोड करा, असे सांगणाऱ्या विविध चिनी ॲप्सची सातत्याने चलती राहते. ‘ड्रॅगन’च्या या ॲप्समधून आर्थिक आमिष दाखवत आतापर्यंत अनेकांना लाखोंचा गंडा घातला गेला आहे. अशा फसव्या आणि आर्थिक लाभाचे आमिष दाखवून लोकांना पद्धतशीर गंडा घालणाऱ्या ॲप्सपासून आता मोबाईलधारकांनी जागरुक राहण्याची गरज आहे.

बहुचर्चीत फसव्या ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांनी यातून हातोहात लाखो रुपयांची कमाई केली. याचा अनेकांना नाहक फटका बसला. विशेष म्हणजे यासाठी कर्ज देणाऱ्या अथवा अमूक एवढे पैसे भरा, लगेच कर्ज देतो, पैसे दुप्पट करून देतो, असे आमिष दाखविणाऱ्या अनेक कंपन्या केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. खर तर केवळ रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे नोंदणी असलेल्या बँका किंवा नोंदणीकृत नॉन बँकिंग वित्तसंस्थाच कर्ज देऊ शकतात. मात्र, नियम अडगळीत टाकून फसवणुकीचे जाळे टाकणाऱ्या चिनी अ‍ॅपच्या मायावी फसव्या भूलभुलैया आता अधिकच गहिरा होत चालला आहे.मात्र, ऑनलाईन क्राईम, सायबर क्राईमचा फटका बसणाऱ्या व्यक्ती जागरुक राहत नाही, यामुळे सायबर भामटे मोकट सुटले आहे.

ॲप घ्या, पाच मिनिटांत इन्स्टंट कर्ज

मध्यंतरी तर एका चिनी ॲपने ॲप डाऊनलोड केल्यापासून काही मिनिटाच्या आत पाच हजारांपासून तर पन्नास हजारापर्यंत कर्ज देण्याचे आमिष दाखविले होते. तसे एसएमएस आले. मात्र, यासाठी माहिती भरताना ओटीपी मागितला गेला. ओटीपी हातात आल्यापासून जेमतेम मिनिटभरातच अनेकांच्या बँक खात्यावरील पैसे काढून घेतल्या गेले. अशा इन्स्टंट लोनची ग्वाही देणाऱ्या ॲप्सपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here