

वर्धा : फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये अनधिकृत प्रवेश करून दाम्पत्याने महिला डॉक्टरला माझे रामनगरातील मोठ्या गुंडांशी संबंध आहेत, असे म्हणत शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर बळजबरी क्लिनिकमधून बाहेर काढत स्वत:चे कुलूप लावून अवैधरीत्या कब्जा केला.
महाराणा प्रताप व्यापारी संकुलातील गाळा क्रमांक २६ मध्ये मागील दहा वर्षांपासून डॉ. रेवती मधुकर देवतारे यांचे फिजिओथेरेपचे क्लिनिक आहे. त्या प्रत्येक महिन्याला प्रमोद वानखेडे आणि वंदना वानखेडे यांना पाच हजार रुपये भाडे देत आहेत. तसेच, पगडी म्हणून तीन लाख रुपयेही दिलेले आहेत. १४ रोजी वानखेडे दाम्पत्याने अनधिकृतपणे क्लिनिकमध्ये प्रवेश करीत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत क्लिनिकबाहेर काढून स्वत:चे कुलूप लावले. क्लिनिकमध्ये बरेच साहित्य असून दोन लाख २४ हजारांची रोख. सोन्याच्या अंगठी, मशीन आदी साहित्य आहे. त्यामुळे मला पगडीची तीन लाखांची रककम आणि इतर साहित्य परत करावे व आरोपींवर कारवाई करावी, अशी तक्रार डॉ. रेवती देवतारे यांनी रामनगर पोलिसांत केली आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार यांच्याकडून केली जात आहे.