अधिसूचना जारी! आता बिलावर अन्न परवाना क्रमांक नमूद करणे बंधनकारक; बैठकीत दिल्या सूचना

वर्धा : केंद्रीय अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कोणताही अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांनी आपले बिल, इनव्हाईस, चालान यांच्यावर त्याचा अन्न परवाना, नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक यापुढे बंधनकारक केला आहे. ही अधिसूचना १ जानेवारी २०२२पासून लागू होणार असून, याबाबत सर्व अन्न व्यावसायिकांना याची माहिती होण्यासाठी सहाय्यक आयुक्‍त अन्न यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत अन्नपदार्थ विक्रेते तसेच उत्पादकांना याची माहिती देण्यात आली.

या बैठकीला जिल्ह्यातील विविध अन्नपदार्थांचे मिठाई उत्पादक, विक्रेते, खाद्यतेल उत्पादक, विक्रेते, अन्य खाद्यपदार्थ, वितरक उपस्थित होते. बैठकीत केंद्रीय अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरणाव्दारे जारी अधिसूचनेबद्दल सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना अन्न सुरक्षा अधिकारी कि. र. गेडाम यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीदरम्यान अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील विविध तरतुदींबाबत मार्गदर्शन करुन चर्चा करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी रा. ब. यादव यांनी बिलावर परवाना नंबर नसेल तर कारवाई करण्यात येईल, या तरतुदींचे उल्लंघन केल्यास दंडाच्या तरतुदीबाबत सर्वांना अवगत करण्यात आले. ग्राहकांनी जागरुक होऊन खाद्यपदार्थ खरेदी केल्यानंतर व्यावसायिकांकडून बिल घ्यावे. ग्राहकांना शुद्ध अन्न मिळावे व त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी अन्न व्यावसायिकांनी दुकानाचा परिसर स्वच्छ ठेवावा, योग्य व सुरक्षित अन्न ग्राहकांना वितरित करणे ही प्रत्येक अन्न व्यावसायिकाची जबाबदारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here