
वर्धा : ऑटॉसह दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून याप्रकरणी तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेने वायगाव (नि.) ते देवळी मार्गावर एका अट्टल वाहन चोरट्याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस हिसका दाखविताच त्याने आठ गुन्ह्यांची कबुली दिल्याने अटक केली.
सूरज ऊर्फ भ्रीमराव ऊर्फ गोलू टेकाम (२०, रा. कैलासपूर, ता. कळंब, जि. वर्धा) असे आरोपीचे नाव आहे. आलोडा (बोरगाव) येथील रहिवासी स्वप्नील तुलसीदास खेवले यांच्या मालकीची एम.एच.४० एच. २५१९ क्रमांकाची दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार अल्लीपूर पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास सुरू होता. गोलू टेकाम हा चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी वायगाव (निपाणी) परिसरात पेट्रोलिंग सुरू केले.
यादरम्यान एक युवक दुचाकी घेऊन वायगावकडून देवळीकडे संशयितरीत्या भरधाव जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, त्याने जिल्ह्यातील आठ गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये एम. एच. ४० एच. २५१९, एम.एच. 3२ जी. ६१८८, एम. एच.२९ए,ए. ७२८२ एम. एच. 3२ ए. एफ. १२२६, एम. एच.3२ ए.डी. ९९५६, एम. एच. 3२ जी. ४२३०, एम. एच. 3२ एफ. एन. ४८३८ या दुचाकींसह एम. एच. 53२ सी. ६५३२ क्रमांकाचा ऑटो चोरल्याचे सांगितले.
या सर्व गुन्ह्यापैकी सहा दुचाकींसह ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे यांच्या निर्देशानुसारा पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, सौरभ घरडे, संतोष दरगुडे, नरेंद्र डहाके, प्रमोद पिसे, अविनाश बन्सोड, रामकिसन इप्पर, दिनेश बोथकर, नितेश मेश्राम, प्रदीप वाघ आदींनी केली.