

वर्धा : ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये गळ्यातील दुपट्टा गुंडाळल्याने युक्काच्या गळ्याभोवती फास लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पुजई येथे १ एप्रिल रोजी घडली असून, सेवाग्राम पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. मंगेश हरिचंद्र जाधव (रा. दोडकी तांडा, जि. नागपूर) असे मृताचे नाव आहे. अतुल सुधाकर देशमुख याने शेतीच्या कामासाठी एम. एच. ३२ ए.एस. २७९१ क्रमांकाचा ट्रॅक्टर घेतला आहे. त्याच्या शेतात वीटभट्टीदेखील आहे. ट्रॅक्टरवर चालक म्हणून मंगेश हा मागिल ४ वर्षा पासून कामाला असून त्याचे आई- वडीलदेखील वीटभट्टीवर कामावर आहेत.
१ एप्रिलला वीटभट्टीची माती तयार करण्याच्या कामासाठी ट्रॅक्टरने मंगेश हा मातीचा गारा तयार करण्याचे काम करीत असताना रोटावेटरमध्ये मंगेशच्या गळ्यातील दुपट्टा गुंडाळला गेल्याने गळ्याभोवती फास लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली होती. सेवाग्राम पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे मंगेशच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.