
वर्धा : कोविड उपाययोजना संदर्भात शासनाने पुकारलेल्या लॉकडाउन दरम्यान अनेक सायकल रिक्षा चालकांचा रोजगार गेला. यामुळे शासनाने त्यांना दीड हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. हा लाभ मिळण्याकरिता वर्ध्यातील सायकल रिक्षा चालकांनी नगर परिषदेत येऊन ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहन मुख्याधिकारी विपिन पालिवाळ यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन नगर विकासविभाग यांच्या पत्रानुसार कोविड-१९ चा संसर्ग थांबविण्याकरिता करण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी राज्यातील निर्बंधामुळे परिणाम झालेल्या विविध व्यवसायातील नागरिकांना १ हजार ५०० रूयांची सहाय्यता घोषित केली आहे. याकरिता वर्ध्यात कार्यरत असणाऱ्या सर्व मानव चलित रिक्षा चालकाची माहिती संकलित करण्याच्या सूचना नगर विकास विभागाकडून आल्या आहेत. यामध्ये मानवचलित रिक्षा यांचा वापर प्रवासी वाहतुकी करिता करण्यात येतो याची माहिती समाविष्ट करावयाची आहे. म्हणून वर्धा नगर परिषद हद्दीत राहणाऱ्या सर्व मानवचलित रिक्षाचालक जे प्रवासी वाहतूक करतात अशांनी नगर परिषद वर्धाकडे ऑनलाइन नोंदणी न.प.च्या संकेतस्थळावर किंवा जवळच्या ई-सेवा केंद्र यांच्याकडे करावी.
या कागदपत्रांची गरज
नोंदणीकरिता मानवचलित रिक्षाचालक यांनी आधार कार्ड, पत्ता दर्शविणारे ओळखपत्र, सुरू असलेल्या रिक्षाचे चेसीस क्रमांक, बँक खाते क्रं. आदी माहितीसह नोंदणी करावी तसेच नगर परिषद वर्धाद्वारे विहित केलेल्या स्वयं घोषणा पत्र भरून द्यावे. प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र मानवचलित रिक्षाचालक यांना नोंदणी क्रमांक नगर परिषद मार्फत देण्यात येईल, अर्ज जवळच्या ई-सेतू केंद्र, नगर परिषद कार्यालय येथे स्वयं:घोषणा पत्र आणि ऑनलाइन अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.