चिकणी : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने शासनाला निवेदन सादर केले होते. मात्र, मागण्या अद्याप मंजूर न झाल्यामुळे राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायतीं मधील ६० हजार कर्मचारी १९ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपात वर्धा, देवळी तालुक्यातील चाळीस कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे देवळी तालुक्यातील सचिव प्रवीण वाकुडकर यांनी दिली.
उर्वरित ग्रामपंचायत कर्मचारी पंचायत समितीस्तरावर होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी होतील. ६० हजार कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न २० वर्षांपासून प्रलंबित असून, याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अनेकदा शासनाला कळविले. पत्रव्यवहारसुद्धा केला आहे. मात्र, आश्वासनाशिवाय काहीही पदरात पडले नाही. यामुळेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंबंधी निर्णय अद्यापही झालेला नाही. त्यामुळे कर्मचारी १९ एप्रिलला मुंबई येथे आझाद मैदानावर बेमुदत संपावर जाणार आहेत.