
वर्धा : प्रेमात अखेरच्या श्वासापर्यंत साथ देण्याचे वचन देऊनच दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवित होते. एकांत मिळावा म्हणून दुचाकीने फिरायला निघालेल्या या प्रेमीयुगुलांचा नियतिने घात केला. अपघातात त्यांचा जागीच करुण अंत झाल्याने त्यांनी घेतलेले वचन या अपघाती मृत्यूने खरे ठरलेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कार्तिक दिलीप जाधव रा. झोपडपट्टी आणि पूजा प्रशांत मैंद रा. नटाळा पूनर्वसन, असे मृतांचे नाव आहेत. या दोघांचेही प्रेमसंबंध होते. या दोघांचेही जमतेम प्रेम फुलायला लागले होते. दोघेही एकमेकांना भेटून प्रेमाच्या आणाभाका घेत भावी आयुष्याचे स्वप्न बघत होते.
बुधवारी सायंकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे हे दोघेही एम. एच. 3२ एल. ५६४१ क्रमांकाच्या दुचाकीने कारला चौकातून बायपास मार्गाकडे लाँगड्राईव्हकरिता जात होते. दुचाकीने जात असतानाच कारला चौकात मागाहून भरधाव आलेल्या एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात कार्तिक आणि पूजा हे दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. याची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातबद्दल कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनीही अपघातस्थळी धाव घेतली. रस्त्यावर पडलेले मृतदेह पाहून त्यांचेही अवसान गळाले. अखेर गुरुवारी या दोघांचेही मृतदेह शहरातील मोक्षधामात आणण्यात आले. दोघांवरही एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आला. या घटनेने दोन्ही परिवाराला जबर धक्का बसला असून स्मशानभूमीमध्ये नातेवाईकांची गर्दी दिसून आली. यावेळी दोन्ही परिवारातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. युवकाचे मित्रमंडळीही येथे उपस्थिती होती. अपघाताबाबत तर्कवितर्क लावले जात होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावडे करित आहे.
















































