काकानेच लावली जिनिंग मधील कापसाला आग

आर्वी : एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात पेट्रोलची शिशी घेवून आर्वी येथील के.डी. जिनिंगमध्ये प्रवेश केलेल्या दीपक त्र्यंबक देशमुख याने चक्क पुतण्यावर प्राणघातक हल्ला करून जिनिंगच्या आवारातील कापूस जाळला. या प्रकरणी तक्रारीवरून आर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. या आगीत जिनिंग मधील ४६ लाखांचा कापूस जळून कोळसा झाला. आगीची माहिती मिळताच आर्वी न.प. च्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

कौस्तुभ उर्फ गौरव किशोर देशमुख रा. साईनगर आर्वी यांनी कर्ज घेवून २०१७ मध्ये देऊरवाडा मार्गावर के. डी. जिनिंग ॲण्ड प्रेसिंगची फॅक्टरी सुरू केली. घटनेच्या दिवशी जिनिंगच्या आवारात मोठ्या प्रमाणात कापूस होता. रविवारी सकाळी जिनिंगमध्ये संजय उपाध्ये, दीपक काळे, मयूर पवार, रामदास काळे हे हजर असताना एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात पेट्रोल भरलेली शिशी घेवून दीपक देशमुख व त्याचा सहकारी नासरे हे तेथे आले. आरोपी दीपक देशमुख इतक्यावरच थांबला नाही तर त्यांने टेबलवर तलवार आपटत तुझा बाप माझी बदनामी करत आहे, असे म्हणत जिनिंगमधील कापसाला आगीच्या हवाली केले. शिवाय घटनास्थळावरून पळ काढला. दीपक देशमुख याने पळ काढताना गौरव याचा मोबाईल हिस्कावून तो आगीत फेकला. त्यानंतर आगीची माहिती अग्निशमन विभागाला देत पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच आर्वीचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. या प्रकरणी गौरव देशमुख यांच्या तक्रारीवरून गौरवचे काका दीपक देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here