चाकू भोसकून भावाने केली बहिणीची हत्या! तरोडा पारधी बेडा येथील घटना; आरोपी करायचा आईशी वाद

हिंगणघाट : चाकूने भोसकून भावानेच मोठ्या बहिणीची हत्या केली. ही घटना तालुक्यातील तरोडा पारधी बेड्यावर घडली. स्मिता सगुणाथ पवार, असे मृतकाचे नाव असून, अमित चुंगदेव राऊत (3१) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपीला हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, तरोडा पारधी बेड्यावर राहणारा अमित राऊत पैश्यासाठी नेहमीच त्याच्या आईशी वाद करायचा. इतकेच नव्हे, तर बहुदा मारहाणही करायचा. विवाहिता स्मिता पवार हिने अमितला, तू आईला नेहमी का मारहाण करतो, असे विचारले असता, त्याने जवळ असलेल्या चाकूने स्मिताला मारहाण केली. यात स्मिता ही जंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्वात आले.

या प्रकरणी सुरुवातीला हिंगणघाट पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 3२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी स्मिताला रुग्णालयातून घरी आणण्यात आले. ती घरी पोहोचताच तिला भोवळ आली. यातच तिचा मृत्यू झाला. परिणामी, या प्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी अमित राऊत याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास हिंगणघाटचे ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पी. आर. पाटणकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here