राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको! आक्रोशाने अधिकारीही घामाघूम; दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा: वाघाच्या दहशतीतून मुक्‍तता करण्याची मागणी

कारंजा (घाडगे) : वाघाच्या दहशतीत जगणाऱ्या शेतकऱ्यांची यातून सुटका करावी, वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या परिवाराला ५० लाखांची तातडीने मदत द्यावी, यासह इतर मागण्यांकरिता माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात नागपूर-अमरावती महामार्गावरील हेटीकुंडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात असंख्य शेतकरी उपस्थित होऊन त्यांनी रोष व्यक्‍त केल्याने आंदोलनस्थळी आलेले अधिकारीही घामाघूम झाले होते.

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून या रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलनस्थळी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रमितेचे पूजन करून आंदोलनाला सुरुवात झाली. तसेच आतापर्यंत आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेतकरी, शेतमजूर व गोपालकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेला रास्ता रोको दोन तास चालल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आंदोलनकर्त्यांच्या आग्रहास्तव वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावली; पण नागरिकांचा रोष बघता अधिकाऱ्यांनी घामाघूम होऊन तेथून पलायन केले, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; पण माजी आमदार काळे यांच्या आवाहनानंतर सर्वांनी शांततेच्या मार्गाचे रास्ता रोको आंदोलन करून काही वेळाने सांगता केली, यावेळी वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. वनविभागाने जंगल व्याप्त गावांमध्ये गस्त वाढवून गाव शिवारापर्यंत येणाऱ्या वन्यप्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अंशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here