
वर्धा : आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषि विभागाच्या वतीने कृषि संजिवनी मोहिम सुरू करण्यात येत आहे. 21 जून ते 1 जूलै या कालावधीत महत्वाच्या विषयांवर विशेष भर देऊन प्रचार, प्रशिक्षण व प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
21 जून रोजी बी बी एफ लागवड तंत्रज्ञान (रुंद बरंबा तंत्रज्ञान), 22 जून बीजप्रक्रिया, 23 जून जमीन आरोग्य प्रत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, 24 जून कापूस एक वाण, कडधान्य व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान, 25 जून विकेल ते पिकेल, 28 जून महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, 29 जून दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्याचा सहभाग, 30 जून जिल्हयातील महत्वाच्या पिकांच्या किड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 1 जुलैला कृषि दिनासोबतच मोहिमेचा समारोप होईल. कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभाग मिळून या कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करणार आहे. कृषि विद्यापीठाचे संशोधन तंत्रज्ञान, अद्यावत कृषि तंत्रज्ञान या मोहिमेत प्रसारित करण्याचा प्रयत्न आहे.
या कार्यक्रमादरम्यान कृषि विभागाच्या महत्वाच्या योजनांची माहिती ब्लॉग स्पॉटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ऑटो रिप्लाय-कृषि विषयक योजनांची माहिती व्हाट्सएप मिळविण्यासाठी ऑटो रिप्लाय ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. व्हाट्सएपवर योजनेची माहिती मिळण्यासाठी 918010550870 या क्रमांकावर ज्या योजनेची माहिती हवी आहे त्या योजनेचा कीवर्ड टाईप करून पाठविल्यास त्या योजनेची माहिती तात्काळ प्राप्त होईल. या ऑटो रिप्लाय सुविधेचा सुध्दा या मोहिमेच्या दरम्यान प्रचार प्रसार व माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल.
यु ट्यूब चॅनल – www.youtube.com/agriculturedepartment.gov असे कृषि विभागाचे यु ट्यूब चॅनल आहे. या मोहिमे दरम्यान शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांना दाखविण्यात येणार आहे. कृषि विभागाच्या या कृषि संजिवनी कार्यक्रमात शेतक-यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.