अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम : उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने  महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज स्पष्ट केले आहे. त्यांनी यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहून आपली भूमिका ही यापूर्वीच मांडली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने  महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत झालेल्या या बैठकीत परीक्षा घेऊ नये ही भूमिका कायम ठेवण्यात आली असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ‘परीक्षा घेऊ नये ही भूमिका आपत्ती व्यवस्थपन समिती ने कायम ठेवली. आजची कोविडची परिस्थिती पाहता परीक्षा घेणं शक्य नाही. अनेक महाविद्यालयात क्वारन्टाइन सेंटर करण्यात आले आहेत. मागच्या परिस्थिती पेक्षा आताची कोविड संसर्गाची परिस्थिती गंभीर आहे,’ असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्राला पत्र पाठवून राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे याआधीही सांगितले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सचिव उच्च शिक्षण भारत सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डी.पी,सिंग यांना पाठलेल्या पत्रात मंत्री सामंत यांनी म्हटले होते की,कोरोना रूग्ण संख्येत आज भारत तिस-या स्थानी असून, महाराष्ट्रात हे सर्वाधिक बाधित राज्य आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अंतिम वर्षाच्या  सत्राच्या दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची परिक्षा घेणे अतिशय जिकीरीचे होणार आहे.तसेच त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, पूरक कर्मचारी तसेच इतर यंत्रणांचे स्वास्थ धोक्यात येऊ शकेल. सध्या विविध शैक्षणिक संस्था, वसतीगृहे आणि इतर सुविधा या विलगीकरणासाठी तसेच कोरोना संबंधित इतर कारणांकरिता प्रशासनाद्वारे अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थी हे त्यांच्या मूळ गावी परतले असल्याने, परीक्षा घेतल्यास विद्याथ्यांचा परतीचा प्रवास, त्यांची निवास व भोजन व्यवस्था या चितेच्या बाबी आहेत. असे केल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच काही इतर राज्यांमध्ये तसेच देशांमध्ये परिक्षा घेतल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना सदर विषाणूची लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत असेही सामंत यांनी या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत अनेक विद्यार्थी संघटनांनी केले आहे. आणि आज झालेल्या बैठकीमध्ये परीक्षा न घेण्याबाबतचा निर्णय कायम ठेवण्यात आला. आता केंद्र शासन याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

*दखल न्यूज भारत*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here