२२० शेतकऱ्यांना मिळणार शेततळे! मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना; खोदकामासाठी ७५ हजाराचे अनुदान

वर्धा : शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे याकरीता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे बांधून दिले जात आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत ६९ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करण्यात आले आहे. या योजनेतून विविध आकारमानाच्या शेततळ्यांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते.

सिंचनाअभावी पिक उत्पादनात होणारी घट थांबविणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न व उत्पादकतेत वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणे, पर्जन्य आधारीत शेतीसाठी पाणलोटावर आधारीत जलसंधारणाच्या उपाययोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविणे व शेतकऱ्यांना शेततळे खोदकामासाठी प्रोत्साहित करण्याकरीता ही योजना राबविली जाते. यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यासोबतच भुगर्भातील पाण्याचे पुनर्भरण देखील केले जाते.

जिल्ह्याला २२० वैयक्तिक शेततळे बांधकामाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांकडून प्राप्त अर्जांपैकी परिपुर्ण असलेले ६९ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. उर्वरीत अर्ज मंजूरीची प्रक्रिया सुरु आहे. शेततळ्याच्या लाभासाठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज सादर केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने केली जाते. निवड झालेल्या शेतकऱ्यांना शेतजमिनीचा ७/१२, ८/अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, हमीपत्र, जातीचा दाखला महाडीबीटी प्रणालीवर अपलोड करावा लागतो. योजनेंतर्गत विविध आकारमानाचे शेततळे मंजूर केले जातात. त्यासाठी कमाल ७५ हजार रुपये इतके अनुदान मंजूर केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here