Home जिल्हा वर्धा विसर्जन कुंड की विटंबनेचा खड्डा? सात महिन्यांनंतरही भग्न गणेशमूर्तींचा ढिग ; प्रशासनाचे...

विसर्जन कुंड की विटंबनेचा खड्डा? सात महिन्यांनंतरही भग्न गणेशमूर्तींचा ढिग ; प्रशासनाचे दुर्लक्ष कायम

पवनार : नंदीखेडा परिसरातील धाम नदीवरील कृत्रिम विसर्जन कुंडाची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. गणेशोत्सवाला तब्बल सात-आठ महिने उलटूनही या कुंडाची साफसफाई झालेली नसून, भग्न गणेशमूर्तींचे अवशेष आजही त्याच अवस्थेत पडून आहेत. पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून उभारलेल्या या कुंडात आता श्रद्धेची विटंबना आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

काही वर्षांपूर्वी नदीप्रदूषण रोखण्यासाठी आणि पारंपरिक विसर्जनाला पर्याय देण्यासाठी प्रशासनाने मोठ्या खर्चातून हे कृत्रिम कुंड उभारले होते. मात्र, प्रत्यक्षात विसर्जनानंतरची देखभाल पूर्णपणे दुर्लक्षित राहिल्याने हा उपक्रम केवळ कागदोपत्रीच राहिला आहे.

मागील गणेशोत्सवात हजारो पीओपी व मातीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन या कुंडात करण्यात आले होते. आजही त्या मूर्ती गाळात अडकलेल्या, अर्धवट विघटित अवस्थेत किंवा पाण्यावर तरंगताना दिसतात. अनेक मूर्तींचे हात, पाय, मुकुट व डोके तुटलेल्या अवस्थेत विखुरलेले असून, कुंडाभोवती साचलेले सडलेले पाणी, वाढलेले गवत आणि दुर्गंधी हे दुर्लक्षाचे ठळक पुरावे ठरत आहेत.

गणेशमूर्ती ही भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असते. विसर्जनानंतर मूर्तींचे असे भग्नावशेष पाहून भाविकांच्या भावना दुखावल्या जात असून, अनेकांच्या मते ही थेट ‘विटंबना’ आहे. दरवर्षी हा प्रकार घडत असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पर्यावरणीय दृष्टीनेही ही परिस्थिती गंभीर आहे. पीओपी आणि रासायनिक रंगांमुळे पाण्याचे प्रदूषण वाढत असून, जलीय जीवसृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. कुंडातील पाणी महिनोनमहिने स्थिर राहिल्याने शैवाल वाढ, डास-कीटकांची उत्पत्ती आणि दुर्गंधीमुळे परिसरातील आरोग्य धोक्यात आले आहे.

विसर्जनाच्या काळात तात्पुरती व्यवस्था उभारली जाते; मात्र त्यानंतर कुंडाच्या स्वच्छतेसाठी कोणतीही कायमस्वरूपी यंत्रणा कार्यरत नसल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्षच होत असल्याने, कृत्रिम विसर्जन कुंड उभारण्यामागचा मूळ उद्देशच फोल ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. विसर्जनानंतर लगेच कुंडातील मूर्ती व गाळ काढणे, नियमित स्वच्छता करणे, तसेच कायमस्वरूपी कर्मचारी व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. धार्मिक परंपरा आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे जाणकार सांगतात.

कृत्रिम कुंड की केवळ औपचारिकता?

कृत्रिम विसर्जन कुंड ही संकल्पना पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य असली, तरी त्याची योग्य देखरेख आणि वेळेवर स्वच्छता न झाल्यास हा उपक्रम निरर्थक ठरत आहे. विसर्जनानंतर मूर्तींची अशी दुर्दशा होणे हे केवळ निष्काळजीपणाचे नव्हे, तर धार्मिक श्रद्धांचा अपमान मानला जात आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून दरवर्षी दिसणाऱ्या या चिंताजनक व अपमानास्पद परिस्थितीला पूर्णविराम द्यावा, अन्यथा या प्रकल्पावर झालेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया…

धाम नदीवरील कृत्रिम विसर्जन कुंडाची सध्याची अवस्था अत्यंत संतापजनक आहे. गणेशमूर्तींचे असे भग्नावशेष पडून राहणे ही श्रद्धेची उघड विटंबना आहे. प्रशासनाने तात्काळ कुंडाची स्वच्छता करून जबाबदारी निश्चित करावी. अन्यथा, बजरंग दलाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

बबलू राऊत, जिल्हा संयोजक, बजरंग दल वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!