कामगारांच्या पेट्यांसह कंत्राटदाराचे रातोरात पलायन! जिल्हाभरातून लाभार्थींची होती उपस्थिती; गर्दीला पाहून अर्ध्यावरच गुंडाळला कार्यक्रम

देवळी : नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सुरक्षा किटसह लोखंडी पेटीचे वाटप केले जाते. या पेट्या घेण्याकरिता देवळीतील दत्त मंगल हुक, कार्यालयात लाभार्थींना बोलाविण्यात आले होते. परंतु लाभाथींची उसळलेली गर्दी पाहून रात्रीतूनच कंत्राटदाराने पेट्यांसह पळ काढला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा लाभार्थींची गर्दी जमल्याने अनेकांना आल्या पावलीच परतावे लागले, तर काहींनी याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली.

देवळीत गोनिया कमर्लिअल नामक कंपनीच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना पेट्या वाटप करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार दर दिवसाला ४०० ते ५०० पेट्या वाटपाचे नियोजन होते. परंतु मंगळवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील आष्टी, आर्वी, कारंजा, वडकी आदी दूरवरून तब्बळ अडीच ते तीन हजार बांधकाम कामगार पेट्या घेण्याकरिता उपस्थित झाले. कंत्राटदाराने काहींना पेट्या दिल्या, तर काहींना बुधवारचे टोकन परत केले. हा गोंधळ आणि कामगारांची संख्या पाहून कंत्राटदाराने रात्रीतून पेट्यांसह पलायन केले. त्यामुळे बुधवारी आलेल्या शेकडो कामगारांना पेटी वाटपाचा कार्यक्रम बंद झाल्याचे निदर्शनास आल्याने धक्काच बसला.

यातील काही कामगारांनी खासदार रामदास तडस तर काहींनी भाजपचे प्रदेश सचिव राजेश बकाने यांचे निवासस्थान गाठून या गोंधळाची माहिती दिली, तर काहींनी रोष व्यक्त करुन गावचा रस्ता धरला. यामध्ये महिलांची उपस्थिती लाक्षणीय होती. कामगार कल्याणकारी मंडळाकडून विविध योजनांचा लाभ दिल्या जातो; परंतु यामध्ये दलालांच्या माध्यमातून बोगस कामगारांची नोंदणी करण्यात आली असून, खरे लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी आणि एजंट यांच्यातील सलोख्याच्या संबंधामुळे हा प्रकार फोफावला असून, ही बाब शासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरत आहे. देवळीमध्ये पेट्या वाटपाचा कार्यक्रम कोणाच्या सूचनेवरून घेण्यात आला. त्यासाठी कुठल्या लाभार्थींना पाचारण करण्यात आले होते. याकरिता स्थानिक कोणत्या एजंटचा वा संघटनांचा पुढाकार होता काय, याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

महिला झाल्या जखमी

देवळीत पेटी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने महिला लाभाथींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कंत्राटदारावर कापगार अधिकार्‍यांचे नियंत्रण नसल्याने कोणतीही व्यवस्था न करता कोरोनाच्या काळात मोठी गर्दी गोळा झाली होती. या गर्दीत दोन पहिला खाली पडल्याने त्या जखमी झाल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here