
वर्धा : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने व्यापक तयारी सुरू केली असून जिल्ह्यात एकूण ४ लाख १९ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. बियाणे, खते आणि कृषी साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासोबतच शेतकऱ्यांना योग्य पीक नियोजन करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
यंदाच्या हंगामात कापूस पिकाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असून २ लाख २४ हजार १९९ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याखालोखाल सोयाबीनसाठी १ लाख २४ हजार ५०० हेक्टर, तूरसाठी ६५ हजार ६९० हेक्टर तर मका पिकासाठी २ हजार ५०० हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान, सोयाबीन पिकावर वाढत्या चारकोल रॉटसारख्या रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेता कृषी विभागाने पीकपद्धतीत बदल करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे सोयाबीन क्षेत्रात कपात करून मका, तूर आणि कापूस पिकांना प्रोत्साहन देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. मका लागवडीचे क्षेत्र वाढवून ते सुमारे ६ हजार ५०० हेक्टरपर्यंत नेण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे.
खरीप हंगाम सुरळीत पार पडावा यासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी १ लाख १७ हजार ९०० मेट्रिक टन खतांची गरज गृहीत धरण्यात आली असून यामध्ये युरिया, डीएपी आणि संयुक्त खतांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात ५५ हजार २२२ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
बोगस बियाण्यांचा प्रश्न लक्षात घेता कृषी विभागाने विशेष पथके सक्रिय केली आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे तसेच कोणतीही अडचण आल्यास कृषी सहाय्यक किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी केले आहे.


























































