रामटेक (जि. नागपूर) : लॉकडाउनमध्ये सूट दिल्यानंतर नागपूरचे काही मित्र रामटेकला मौजमजा करायला गेले. प्रवेशबंदी असताना चोरून अंबाडा तलावात पोहायला गेलेल्या मित्रांपैकी दोघे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाल्याची घटना तीर्थक्षेत्र अंबाळा परिसरात बुधवारी (ता. ९) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर रविनगर परिसरातील सहा मित्र निसर्ग प्रभाकर वाघ, कृणाल अशोक नेवारे, अभिनव जिचकार, प्रणय वासनिक, तन्मय कुंभारे, लक्ष्मीकांत बबडीलवार हे एमएच ४३-बीपी ५६०८ क्रमांकाच्या कारने रामटेककडे फिरायला आले. कोरोनामुळे तीर्थक्षेत्र अंबाळा तलाव परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी होमगार्डचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
परिसरात येताच होमगार्डने त्यांना परिसरात प्रवेश करण्यास मनाई केली. मात्र, युवकांनी रस्त्याच्या कडेला वाहन लावून डोंगरमार्गाने अंबाळा तलाव परिसरात प्रवेश केला. अंघोळ करण्यासाठी चार मित्र तलावात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न लागल्याने निसर्ग आणि कृणाल खोल पाण्यात बुडायला लागले. दोघांना आपला बचाव करता आला नाही. पाण्यात गटांगळ्या खात बुडू लागले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे प्रवेशबंदी असल्यामुळे त्यांना मदत करणारे तेथे कोणीही नव्हते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक मासेमारांच्या साहाय्याने शोध घेतला. तलावातून निसर्ग याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. कृणालचा अद्यापही शोध घेणे सुरू आहे. या शोध मोहिमेत स्थानिक मासेमार व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (रेस्क्यू टीम) सहभागी झाले असून शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक मकेश्वर, एपीआय शेंडगे हे घटनास्थळावर दाखल झाले. प्राथमिक तपास शिवाजी बोरकर, शिपाई संतोष मारबते करीत आहेत.