
वर्धा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून दुचाकीचोरी होत असल्याच्या घटना ताज्या असतानाच चोरट्यांनी रुग्णालयाच्या आवारातून थेट रुगणवाहिकाच चोरल्याने रुग्णालय प्रशासनामध्ये खळबळ उडाली होती.
चोरी गेलेली रुग्णवाहिका शहरातीलच सिद्धार्थनगरात सापडली असली तरी जिल्हा रुग्णालय वाहन चोरट्यांसाठी आवडीचे ठिकाण तर ठरत नाही ना? असा प्रश्न सध्या नागरिकांकडून चर्चिला जात आहे.प्राप्त माहितीनुसार, १८ जून रोजी ड्युटी संपल्यावर एम.एच.५२ जी.०१५१ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या चालकाने या रुग्णवाहिकेचे चावी ड्रायव्हरच्या रुममध्ये ठेवून तो घरी गेला.
दुसऱ्या दिवशी चालक कर्तव्यावर आला असता त्याला रुग्णवाहिकाच बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याने याची माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर रुग्णवाहिका चोरीला गेल्याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच शहर पोलिसांनी आपल्या हालचालींना वेग देत अवघ्या दोन तासांत चोरी गेलेली रुग्णवाहिका शहरातीलच सिद्धार्थनगरातून हुडकून काढली. ही रुग्णवाहिका पोलिसांनी ताब्यात घेतली असली तरी रुग्णालयाच्या आवारात उभी केलेली रुग्णवाहिका नेमकी कुणी चोरून नेली हे अजनही पोलिसांना गवसलेले नाही.