

वर्धा : जन्माची अचूक वेळच निश्चित करता येत नसताना त्या आधारे तयार केली जाणारी कुंडली ही वैज्ञानिकदृष्ट्या ग्राह्य धरता येत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी केले. समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथील कस्तुरबा नर्सिंग कॉलेजमध्ये सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. बार्टीच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
सुरकार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बाळाच्या जन्मानंतर लगेच कुंडली तयार करण्याची प्रथा प्रचलित आहे; मात्र जन्मवेळ नेमकी कोणती धरावी याबाबतच स्पष्टता नाही. गर्भधारणा, गर्भाची वाढ, जन्माच्या वेळी बाळाचा पहिला श्वास किंवा रडणे—या विविध टप्प्यांपैकी नेमकी कोणती वेळ ‘जन्मवेळ’ मानावी, यावर एकमत नाही. त्यामुळे त्या आधारावर तयार होणाऱ्या कुंडलीची विश्वासार्हता संशयास्पद ठरते. १९८४ मध्ये सातारा येथे झालेल्या अखिल भारतीय ज्योतिष परिषदेतही जन्मवेळ ठरविण्याबाबत ठोस निष्कर्ष न निघाल्याचे त्यांनी नमूद केले. ज्योतिष, हस्तरेषा, फेसरीडिंग यांच्या आधारे भूतकाळ किंवा भविष्यकाळ अचूक सांगणे शक्य असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला.
कुंडली, ग्रहदोष, कालसर्प योग, विविध पूजा-अर्चा, होम-हवन यांच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही ठिकाणी अंधश्रद्धेच्या आडून गैरप्रकार घडत असल्याचे उदाहरण देत, नागरिकांनी अशा प्रथांपासून दूर राहून विवेकबुद्धीने विचार करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमादरम्यान विविध प्रात्यक्षिकांद्वारे तथाकथित चमत्कार कसे सादर केले जातात, हेही दाखवून देण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टीने वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. कार्यक्रमाला रजनी सुरकार, ज्ञानेश्वर बडोले, ज्योत्स्ना जांभुळकर, रंजना मस्के यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
























































