
देवळी : भरधाव कार अनियंत्रित होत वर्धा-यवतमाळ मार्गावरील सेलसुरा येथील नदीच्या पुलाच्या सुरक्षा भिंतीवर चढली. हा अपघात मंगळवारी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास झाला. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून कारचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सावंगी (मेघे) येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सात डॉक्टरांचा कार नदीपात्रात पडून मृत्यू झाला त्याच ठिकाणी हा अपघात झाला.
यवतमाळकडून वर्धेच्या दिशेने एम. एच. ०४ इ. क्यू. ४३९२ क्रमांकाची कार जात होती. भरधाव कार सेलसुरा शिवारातील नदीवरील पुलावरील वळण रस्त्यावर आली असता झिकझॅक पद्धतीने दुचाकी ‘पळविणाऱ्याला वाचविण्याच्या नादात कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. अशातच कार नदीच्या पुलाला घासत जात पुलाच्या संरक्षण भिंतीवर चढली. या भीषण अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी कारचा चुराडाच झाला आहे.



















































