
गिरड : कोरोनाच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी तसेच बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी कोरोना नियंत्रक पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकातील अधिकारी व कर्मचारी बेशिस्तांवर दंडात्मक तर वेळ प्रसंगी फौजदारी कारवाई करीत असले तरी कोरोना नियंत्रक पथकातीलच अधिकाऱ्यांकडून नियमांना बगल दिली जात असल्याचे लक्षात येताच ग्रा.पं.च्या पथकाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
या कारवाईमुळे अनेकांची भंबेरीच उडाली होती.कोरोना नियंत्रक पथकाकडून सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर न करणाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाच्या नियमांना बगल देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. कोरोना नियंत्रक पथक गावात दाखल होताच सर्वांकडून खबरदारीच्या नियमांचे पालन केले जात असताना काही नागरिकांनी कोरोना नियंत्रक पथकाचे वाहन अडविले.
त्यानंतर या वाहनात तब्बल दहा व्यक्ती असल्याचे पुढे येताच ग्रा.पं. प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी रेटण्यात आली. त्यानंतर सरपंच राजू नौकरकार, ग्रा.पं. कर्मचारी महाकाळकर यांनी दंडात्मक कारवाई करून दंड वसूल केला. या प्रकरणी घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.