

वर्धा : कोविड रुग्णालयातील बेड उपलब्धता स्थितीची माहिती नागरिकांना सहज मिळावी म्हणून वर्धा जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. इतकेच नव्हे तर स्मार्ट फोनच्या सहाय्याने ‘ई सेवा वर्धा डॉट इन’ या संकेत स्थळावर जाऊनही नागरिकांना कोविड रुग्णालयातील रिकाम्या रुग्णखाटांची माहिती जाणून घेता येणार आहे.
जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड बाधितांना जिल्ह्यातील कुठल्या रुग्णालयात आयसीयू, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर रुग्णखाट उपलब्ध आहे याची माहिती घरबसल्या मिळावी या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या होत्या. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्या मदतीने जिल्हाकचेरीत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या नियंत्रण कक्षातील ०७१५२-२४३४४६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यावर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय, सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथील कोविड युनिटमध्ये कुठली रुग्णखाट उपलब्ध आहे, याची माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्यातील कोविड स्थिती पाहता उभारण्यात आलेल्या या यंत्रणेवर उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार हे लक्ष ठेवणार आहेत. ‘ई सेवा वर्धा डॉट इन’ या संकेत स्थळावर प्रत्येक दोन तासांनी रुग्ण खाटांच्या उपलब्धतेबाबत इत्यंभूत माहिती अपलोड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.