जोडणी न करताच दिले जादा विद्युतदेयक! शेतकऱ्यास मनस्ताप; महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

वडनेर : विद्युतजोडणी न करताच शेतकऱ्याला जादा विद्युतदेयक देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नजीकच्या बोपापूर येथे उघडकीस आला आहे. तब्बल २० हजार १८० रुपयांचे विद्युतदेयक देण्यात आल्याने शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे. बोपापूर येथील शेतकरी मनोहर रामचंद्र झाडे यांची बोपापूर शिवारात सहा एकर शेती आहे. वर्षाला किमान तीन पिके घेता यावी, या हेतूने त्यांनी शेतात बोअरवेल खोदली. शिवाय कृषिपंपाच्या विद्युतजोडणीसाठी महावितरणकडे रीतसर अर्ज सादर केला.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ११ जून २०२० ला त्यांना ६ हजार ८०७ रुपयांचा डिमांड दिला. पैशाची जुळवाजुळव करून हा डिमांड शेतकरी मनोहर झाडे यांनी भरला. परंतु, अद्यापही त्यांना त्यांच्या शेतातील कृषीपंपासाठी विद्युतजोडणी मिळालेली नाही. शिवाय महावितरणकडून साधे विद्युतमीटरही बसविण्यात आलेले नाही. मात्र, पाच महिन्यांनी नोव्हेंबर महिन्यात त्यांना थेट २० हजार १८० रुपयांचे अवाजवी विद्युतदेयक देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here