

वर्धा : येथील हिंदनगर परिसरात दारुविक्रेत्याने हातात तलवार घेऊन चांगलच दहशत पसरविला. इतकेच नाही तर परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्यात. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंकुश तिरपुडे असे आरोपीचे नाव आहे. हा हिंदनगर परिसरात राजरोसपणे दारुविक्री करतो. शुक्रवारी दुपारी त्याने परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातात तलवार घेऊन धिंगाणा घातला. यादरम्यान परिसरातील दीपक सुपारे, आकाश लाडेकर, डॉ. अमोल लोहकरे व नंदकिशोर शर्मा या चौघांच्याही कारच्या काचा फोडल्यात. तसेच एका युवकाच्या दुचाकीने नुकसान केले. याप्रकरणी गजानन लोखंडे रा. हिंदनगर यांच्या तक्रारीवरुन अंकुश तिरपुडे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे. रामनगर पोलिसांच्या आशीर्वादानेच तिरपुडेच्या दारु व्यवसायाला भरभराटी आली आहे. त्यामुळेच त्याची इतकी हिंमत वाढल्याने दहशत पसरवित असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
याप्रकरणी तपास करुन परिसरातील दारुविक्रीला आळा घालावा अन्यथा दुर्घटना घडायला वेळ लागणार नाही, असेही नागरिकांकडून बोलले जात आहे.