चारित्र्यावर संशय घेत पत्नीस जीवंत जाळण्याचा प्रयत्न! वाढोणा येथील घटना; आर्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

वर्धा : चारित्र्यावर संशय घेत मद्यपी पतीने पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना आर्वी तालुक्‍यातील वाढोणा येथे घडली असून तक्रारीनंतर शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी आर्वी पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढोणा येथील रुपाली शिवणकर ही मजुरीचे काम करते. तिचा 17 वर्षांपूर्वी सचिन शिवणकर याच्याशी विवाह झाला. सुरूवातीला त्यांचा संसार आनंदाने चालल्याने त्यांना दोन मुलेही झाली. पण मजुरीचे काम करणाऱ्या रुपालीचे पती सचिन हे तिच्याशी नेहमीच वाद करायचे. दारू पिऊन शिविगाळ करायचे. अशातच मंगळवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास सचिन हा मद्यधुंद अवस्थेत घरी परतला. त्याने पत्नी रुपाली हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी बाद केला. आरोपी सचिन हा इतक्यावरच थांबला नाही तर त्याने अति ज्बलनशील पदार्थ असलेल्या डिझेलचा टेंभा रुपालीच्या अंगावर फेकून तिला जीवंत जाळण्याचा प्रयतन केला. यात रुपालीची साडी जळाली. तिची आरडाओरड कानावर पडल्याने शेजाऱ्यानी घटनास्थळाकडे धाव घेतली. रुपालीच्या अंगाबर पाण्याचा मारा करून आग विझविली. पण यात रुपाली ही भाजल्या गेली. सुरूवातीला तिला गावातील दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर तिने परिसरातील एकाच्या घरी आश्रय घेतला. पण दुसर्‍याही दिवशी मद्यधुंद अवस्थेत सचिन याने पत्नी रुपालीशी वाद केल्याने अखेर रुपाली हिने पोलिसात तक्रार नोंदविल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद आर्वी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here