ग्रेड पे वाढवा, अन्यथा बेमुदत कामबंद! तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना झाली आक्रमक

वर्धा : तहसोलदार राजपत्रित वर्ग-2 यांचे ग्रेड पे 4800 रुपये करण्याची मागणी केली होती. सतत पाठपुरावा करूनही या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले. ही मागणी तत्काळ मान्य करुन तसा शासन निर्णय निर्गमित करावा, अन्यथा 3 एप्रिल 2023 पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांना देण्यात आले.

नायब तहसीलदार पद महसूल विभागात महत्वाचे आहे. मात्र, या पदाचे वेतन वर्ग-2 चे नसल्याने ग्रेड पे वाढविण्याबाबत 1998 पासून शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, शासन स्तरावरुन कुठलीही दखल घेतल्या गेली नाही. इतकेच नव्हे तर के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेत वेतन तरटी समिती समक्ष नायब तहसोलदारांचे ग्रेड पे 4800 वाढविण्याबाबत तसेच कामाचे स्वरुप, जबाबदारी आदी माहिती सांगूनही मागणीचा कुठलाही विचार करण्यात आलेला नाही. यामुळे तहसीलदार व नायब तहसीलदारांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. याच अनुषंगाने नाशिक येथे झालेल्या बैठकीत मागण्या मान्य होईस्तोर राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा निर्णय एकमताने घेण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास 3 एप्रिलपासून बेमुदम कामबंद आंदोलनाचा आक्रमक पावित्रा संघटनेने घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here