

देवळी : तालुक्यातील चिंचाळा ते गिरोलीच्या रस्त्यावर देवळी पोलिसांनी कारवाई करून अवैध देशी दारू सहित ११.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. रामेश्वर कारमोरे (रा. वायगाव (निपाणी)) असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिंचाळा ते गिरोली रस्त्यावव सापळा रचण्यात आला. दरम्यान गुरुवारी रात्री वाहन क्रमांक एमएच 3२ एएक्स ७०३९ ही गाडी देशी दारू सहित भरधाव येतांना दिसली.
गाडीला थांबविण्याचा प्रयत्न, चालक पळाला
गाडीला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु गाडी चालकाला समोर पोलिस दिसल्याने त्याने सदर गाडी बाजूला लावून अंधारात पळ काढला. यावेळी या गाडीत १३ खरड्याच्या खोक्यात १ लाख ५६ हजारांची दारू आढळून आली. पोलिसांनी वाहन व दारू जप्त करत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमोल मंडळकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस जमादार स्वप्नील वाटकर, अमोल अंडाळकर व नितेश पाटील यांनी केली.

























































