

आष्टी (शहिद.) : तालुक्यातील लिंगापूर येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानाचे मालक गंगाधर निंभोरकर यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे दुकान लहानआर्वी येथील स्वस्त धान्य दुकानाला जोडण्यात आले. गावकऱ्यांना लिंगापूरवरून लहान आर्वींपर्यंत तीन किलोमीटरचे अंतर पार करून जावे लागते. तेथून धान्य आणणे अडचणीचे ठरत असल्याने स्वस्त धान्याचे दुकान लिंगापूर गावातच देण्याची मागणी गावकऱ्यांनी तहसीलदार सचिन कुमावत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
लिंगापूर हे आदिवासीबद्दल गाव आहे. या गावामध्ये अपंग व्यक्तींची संख्या बरीच आहे. गोरगरीब शेतकरी वर्ग असल्यामुळे दररोज मजुरीला जावे लागते. अशावेळी शासनाकडून मिळणारे स्वस्त धान्य घेण्याकरिता आता दुसऱया गावी पायपीट करीत जावे लागते. गावातील मृत स्वस्त धान्य दुकानदाराच्या वारसांनी तहसील कार्यालय, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे वारस नोंद घेऊन धान्याचे दुकान देण्याची मागणी केली होती. मात्र, पुरवठा विभागाने कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही.
परिणामी स्वस्त धान्याचे दुकान लहानआर्वी गावात जोडण्यात आले. लहानआर्वी येथील स्वस्त धान्य दुकानदार धान्य वाटप करण्यासाठी नागरिकांना सायंकाळी सातनंतर दहा वाजेपर्यंत धान्य वाटप करतो. अशावेळी ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे, त्या लोकांना तीन किलोमीटर पायपीट करीत डोक्यावर धान्य घेऊन गावात जावे लागते, तर काही लोकांना स्वत:च्या पैशाने स्पेशल गाडी करून धान्यासाठी जावे लागते. त्यामुळे यात वेळेचा आणि पैशाचा प्रचंड चुराडा होतो. याची दखल घेत पुरवठा विभागाने तत्काळ स्वस्त धान्याच दुकान लिंगापूर गावात द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तहसीलदार कुमावत यांना निवेदन देताना लिंगापूर येथील विक्रम निंभोरकर, विमल कौरती, अयना श्रीरामे, रेखा गेडाम, अंजना कौरती, लता धुर्वे, चंदा माहुरे, सुमन वावरे, सुवर्णा उईके, अर्चना उईके, राजकन्या निंभोरकर, रेखा निंभोरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.