
राहुल खोब्रागडे
वर्धा : कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीचा फटका आता वर्धा शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायाला बसताना दिसत आहे. १ मे २०२६ पासून १९ किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ झाल्याने सध्याचा दर ३,०७१.५० रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वीही मार्चमध्ये १४४ रुपये आणि एप्रिलमध्ये १९५.५० रुपयांची वाढ झाल्याने केवळ तीन महिन्यांत एकूण १,३३२.५० रुपयांची वाढ झाली आहे. या सलग दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले असून, व्यवसाय टिकवणे कठीण झाले आहे.
स्थानिक हॉटेल चालकांच्या मते, आधीच वीजदर, भाजीपाला, धान्य आणि कामगारांचा वाढता खर्च यामुळे व्यवसायावर ताण होता. त्यातच आता गॅस दरवाढीने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. ग्राहक टिकवण्यासाठी दर वाढवण्याचा निर्णय टाळता येत नसला तरी त्यामुळे ग्राहक कमी होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत चहा, नाश्ता, जेवणाच्या थाळीपासून इतर खाद्यपदार्थांच्या दरात १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वर्ध्यातील अनेक छोटे हॉटेल्स, ढाबे आणि खानावळी आधीच कमी नफ्यावर चालत आहेत. अशा परिस्थितीत सततच्या दरवाढीमुळे काही व्यवसाय बंद पडण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम रोजगारावरही होऊ शकतो. काही ठिकाणी मर्यादित मेन्यू, कमी वेळ आणि पर्यायी इंधनाचा वापर करून खर्च आटोक्यात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ही उपाययोजना दीर्घकाळ टिकणारी नसल्याचे व्यावसायिकांचे मत आहे.
याशिवाय, शहरातील मध्यम व मोठ्या हॉटेल्समध्येही परिस्थिती वेगळी नाही. मोठ्या हॉटेल्सना दररोज अनेक सिलेंडरचा वापर करावा लागतो. त्यामुळे दरवाढीचा परिणाम त्यांच्या ऑपरेशनल खर्चावर मोठ्या प्रमाणात होत असून, नफा मार्जिन कमी होत असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. काही हॉटेल्सनी आधीच मेन्यूमध्ये कपात करण्यास सुरुवात केली असून, कमी खर्चिक पदार्थांवर भर दिला जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, इंधनदर वाढ ही केवळ गॅसपुरती मर्यादित नसून तिचा परिणाम संपूर्ण पुरवठा साखळीवर होत आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे भाजीपाला, धान्य आणि इतर कच्चा माल यांच्याही किमती वाढत आहेत. त्यामुळे हॉटेल उद्योगावर दुहेरी ताण निर्माण झाला आहे.
दरम्यान, हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायिकांनी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कमर्शियल एलपीजीवरील दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा उद्योग अधिक संकटात सापडेल, असा इशारा देण्यात आला आहे. काही व्यावसायिकांनी कर सवलती, अनुदान किंवा पर्यायी इंधनासाठी मदत देण्याचीही मागणी केली आहे.
या दरवाढीचा परिणाम केवळ व्यावसायिकांपुरता मर्यादित राहणार नसून, सर्वसामान्य नागरिकांनाही बाहेरचे जेवण महाग होण्याच्या स्वरूपात त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकणारी ठरणार असल्याचे चित्र आहे. एकूणच, कमर्शियल एलपीजी दरवाढीमुळे वर्ध्यातील हॉटेल उद्योग एका कठीण वळणावर उभा राहिला असून, येत्या काळात परिस्थिती कशी बदलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हॉटेल व्यवसायावर आर्थिक आणीबाणी?
कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर ३ हजारांच्या पुढे गेल्याने वर्ध्यातील हॉटेल व्यवसाय अक्षरशः डगमगला आहे. आधीच महागाई, वीजदर आणि कामगार खर्चामुळे अडचणीत असलेल्या व्यावसायिकांवर आता नव्या दरवाढीचा मोठा आघात झाला आहे. छोटे हॉटेल्स, ढाबे आणि खानावळी बंद होण्याची भीती व्यक्त केली जात असून, दरवाढीमुळे चहा, नाश्ता आणि जेवण महागण्याचे संकेत मिळत आहेत. व्यवसाय टिकवण्यासाठी काही ठिकाणी मेन्यू कमी करण्याची वेळ आली आहे, तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचाही विचार सुरू आहे. हॉटेल उद्योग संकटात गेल्यास अनेक कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होणार, असा इशारा व्यावसायिकांनी दिला आहे.
आधीच वीजबिल, भाजीपाला आणि कामगारांचा खर्च प्रचंड वाढला आहे. आता कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर थेट ३ हजारांच्या पुढे गेल्याने व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. ग्राहक टिकवण्यासाठी दर वाढवणे टाळत आहोत, पण अशीच परिस्थिती राहिली तर छोटे हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते.
विजय वाघमारे, संचालक हॉटेल प्लाझा, पवनार



























































