पैसे परत देऊ न शकल्याने प्रफुल्लची गळफास घेवून आत्महत्या! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अल्लीपूर : येथील सदानंद वॉर्ड भागातील रहिवासी प्रफुल्ल संजय कवडे (२४) याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. प्रफुल्लने आत्महत्येसारखा कठोर निर्णय का घेतला याचा उलगडा करण्यात अल्लीपूर पोलिसांना यश आले असून या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.

प्रफुल्लच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. यांच पाहणी दरम्यान पोलिसांना प्रफुल्ल जवळ एक चिठ्ठी आढळली. ती चिठ्ठी वाचल्यानंतर प्रफुल्ल याने सुनील वरघने व सचिन वरघने यांच्याकडून पछमडी येथे जाण्यासाठी चार हजार रुपये उसनवारीवर घेतले. पण ते तो वेळीच परत करू शकला नाही. सुनील व सचिन यांच्याकडून पैशासाठी तगादा लावल्या जात आहे. शिवाय त्यांनी मारहाण करून पैसे परत न दिल्यास थेट जीवानिशी ठार करण्याची धमकी दिल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे प्रफुल्लने चिठ्ठीत लिहिले असल्याचे दिसून आले.

त्यामुळे या प्रकरणी आता सुनील वरघने व सचिन वरघने या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे, रमेश मिश्रा करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here