ऑनलाईन डिलिव्हरी सेंटरमध्ये चोरी! अडीच लाख लंपास; लॉकरसह रोकड पळविली: सीसीटीव्ही फुटेजही केले गायब

तळेगाव (श्याम.पंत.) : येथील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गालगतच्या इकॉम एक्स्प्रेस ऑनलाइन डिलिव्हरी सेंटरच्या शटरचे लॉक तोडून लॉकरसह २ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनीही लागलीच घटनास्थळ गाठून तपास यंत्रणा कामाला लावली.

इकॉम एक्स्प्रेस ऑनलाइन डिलिव्हरी सेंटरचे पर्यवेक्षक मंगेश प्रभाकर चावरे (3२) रा. साखरा, ह.मु. अंतोरा हे सोमवारी सकाळी सव्वासात वाजता कार्यालय उघडण्यासाठी आले असता त्यांना शटरचे कुलूप तोडलेले दिसले. त्यामुळे चोरी झाल्याचे लक्षात येताच वरिष्ठांना याची माहिती दिली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार तळेगाव पोलिसांना कळविले.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मंगेश चावरे यांच्याकडे असलेल्या चावीने उर्वरित कुलूप उघडून कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयात पार्सल शॉपिंगचे २ लाख ५१ हजार ८९ रुपये ठेवलेले लॉकरच रोकडसह लंपास केल्याचे निदर्शनास आले. यासह ४ हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर असा एकूण २ लाख ५५ हजार ८९ रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले.

कार्यालयातील इतर सीलबंद पार्सल जसेच्या तसेच दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून ठसेतज्ज्ञांसह. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळी आवींचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आशिष गजभिये, पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा व गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here