अवैध मोबाइल टॉवरला महावितरणकडून विद्युत जोडणी

वर्धा : स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रा. पं.ची कुठलीही परवानगी न घेता बोरगाव (मेघे) येथे दोन मोबाइल टॉवर उभारण्यात आले. इतकेच नव्हे तर या अवैध मोबाइल टॉवरला महावितरणकडून थेट विद्युत जोडणी देण्यात आल्याची बाब उजेडात येताच बोरगाव (मेघे) ग्रा. पं. प्रशासनाने अवैध टॉवरचा विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करण्यात आला, पण महावितरणकडून या पत्राला केराची टोपलीच दाखविली जात आहे. त्यामुळे याप्रकरणी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.

प्राप्त माहितीनुसार, बोरगाव (मेघे) येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये स्वप्नील रावते तसेच योगेश वाटखेडे यांच्या घरावर मोबाइल कंपनीचे टॉवर उभे करण्यात आले. मोबाइल टॉवर उभे करताना स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्रसह परवानगी गरजेची असते. परंतु, मोबाइल टॉवरचे काम पूर्णत्वास नेणाऱ्यांनी बोरगाव (मेघे) ग्रा. पं. प्रशासनाकडून कुठलीही परवानगी घेतली नाही. ही बाब लक्षात येताच बोरगाव (मेघे) ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने २० जानेवारी २०२१ रोजी जावक क्रमांक १९७ अन्वये महावितरणच्या कार्यालयाला पत्र पाठवून या मोबाइल टॉवरला विद्युत पुरवठा करू नये, जर विद्युत पुरवठा करण्यात आला असल्यास तो तातडीने खंडित करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली. परंतु, महावितरणकडून या दोन्ही टॉवरचा विद्युत पुरवठा अद्यापही खंडित करण्यात आलेला नाही. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here