
पवनार : गावातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणावर ग्रामपंचायत प्रशासनाने मंगळवारी (ता. ४) सकाळी बुलडोझर चालवत कारवाई केली. पोलीस बंदोबस्तात राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या सभोवतालचा परिसर हे गावातील महत्त्वाचे ठिकाण असून येथे ग्रामपंचायतीमार्फत सौंदर्यीकरणाचे काम झाले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुतळ्यासमोरील मुख्य रस्त्यावर नागरिकांनी घरासमोर पक्की शेड, चबुतरे, गेट, भिंती अशा स्वरूपात अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या संदर्भात ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावून अतिक्रमण हटविण्याचा आदेश दिला होता. मात्र अतिक्रमण हटवले गेले नसल्याने आज ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली.
पक्षपात केल्याचा आरोप….
या कारवाईदरम्यान ग्रामपंचायतीने काही अतिक्रमणे हटवली, तर काही ठिकाणी अतिक्रमण शिल्लक राहिल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. समान अतिक्रमण असूनही आमच्यावर कारवाई, आणि इतरांना सूट कशी असा आरोप यावेळी ग्रामपंचायतीचा प्रशासनावर नागरिकांकडून करण्यात आला.
पुन्हा कारवाई होईल….
ही कारवाई टप्प्याटप्प्याने राबवली जात असून उर्वरित अतिक्रमणावर लवकरच कारवाई केली जाईल. यासंदर्भात संबंधितांना नोटीस देण्यात येणार असून त्यांनी अतिक्रमण स्वतःहून हटवावे अन्यथा दोन दिवसांनंतर कोणत्याही अतिक्रमण धारकांच्या स्पष्टीकरण ग्राह्य धरण्यात येणार नाही. अशी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली.





















































