पहिल्याच दिवशी नागपूर विद्यापीठ फेल! परीक्षा रद्द करण्याची नामुष्की; सर्व्हर हँग, नियोजनाचा विद्यार्थ्यांना फटका

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या पहिल्या दिवशी ढिसाळ नियोजन दिसून आले. सर्व्हरच हँग झाल्याने ऑनलाईन परीक्षाच होऊ शकली नाही. विद्यार्थी सातत्याने प्रयत्न करून अक्षरशः थकून गेले होते. मात्र पेपर सुरू होऊ शकले नाही. अखेर दुपारी विद्यापीठाने तांत्रिक चूक असल्याचे मान्य करत २५ मार्च रोजीचे सर्व पेपर रद्द झाल्याची घोषणा केली. आता हे पेपर कधी होतील याबाबत विद्यापीठाने काहीही स्पष्ट केलेले नाही.

यंदा विद्यापीठाने वेबबेस्ड परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी परीक्षेचा पहिलाच दिवस होता. पहिल्या टप्प्यात बीर्कोम, बीएस्सी, बीई, बीबीए इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना एका तासाच्या कालावधीत ४० प्रश्न सोडवायचे होते. ८ ते ११ या कालावधीत पहिल्या सत्रातील विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार होते. सकाळी ८ वाजता विद्यार्थ्यांनी लॉगिन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पेपर सुरूच होऊ हकला नाही. सर्व्हर, एरर इन अप्लिकेशन असे स्क्रीनवर लिहून येत होते.

विद्यार्थ्यांनी हेल्पलाईनवर फोन केल्यानंतर थोड्या वेळात परीक्षा सुरू होईल, असे त्यांना सांगण्यात येत होते. मात्र दुपारपर्यंत पेपर सुरू होऊ शकले नाही. दुपारच्या सत्रातही हीच स्थिती होती. अखेर विद्यापीठाने गुरुवारचे सर्व पेपर रद्द करण्याची घोषणा केली. नवीन तारीख लवकरच घोषित होईल, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here