जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दुर्लक्षित धोरणामुळे रुग्णांनाही सोसावा लागतोय त्रास! जिल्हा रुग्णालयातच नियमांकडे पाठ; कशी रोखणार तिसरी लाट?

वर्धा : कोविड संकट काळात गरजू आणि गरिबांसाठी उपयुक्त ठरलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या कोविड नियमांकडेच पाठ दाखविली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर क्रमप्राप्त करण्यात आला असला तरी, या ठिकाणी येणाऱ्या अनेक व्यक्ती विनामास्क रुग्णालयात वावरतात.

याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांचे दुर्लक्ष होत असून सीएसच्या दुर्लक्षित धोरणामुळेच रुग्णांनाही नाहक त्रास सोसावा लागत असल्याचे दिसून आले. जिल्हा सध्या तापाने फणफणत असून दररोज अनेक नागरिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. एखादी कोविडबाधित अनवधानाने इतर रुग्णाच्या संपर्कात आल्यास रुग्णालयच कोविडचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ओपीडी फुल्ल

– जिल्ह्यात सध्या व्हायरल फ्ल्यू तसेच डेंग्यू या आजाराने बऱ्यापैकी डोके वर काढले आहे.
– जिल्ह्यातील खासगी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडी सध्या तापाच्या रुग्णांमुळे फुल्ल झाली आहे.
– असे असले तरी, या ठिकाणी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांना बगल दिली जात असल्याचे बघावयास
मिळाले.
– ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी करणारे डॉक्टर अजूनही मास्कचा वापर करीत असले तरी रुग्ण दुर्लक्षच करतात.

सोशल डिस्टन्सिंगचा उडतोय फज्जा

जिल्हा सामान्य रुग्णालयातील फिवर क्लिनिक, तसेच रक्त तपासणी विभागात रुग्णांची दररोज तोबा गर्दी होत आहे. परंतु, याच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला बगल दिली जात आहे.

डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले

नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी, जिल्ह्यात आतापर्यंत १९६ डेंग्यूबाधितांची नोंद घेण्यात आली आहे. डेंग्यू आणि मलेरिया हे दोन्ही कीटकजन्य आजार जिल्ह्यात कासवगतीने आपले पाय पसरत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे.

रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू नयेत…

जिल्हा सामान्य रुग्णालयात मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आदी कोविड नियमांना बगल दिली जात आहे. विशेष म्हणजे याच रुग्णालयात कोविडचे संशयित रुग्णही उपचारासाठी येतात. परंतु, नियमांना बगल दिली जात असल्याने हे रुग्णालय कोविडचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी लक्ष देण्याची गरज आहे.

काहींच्या तोंडाला मास्क नाहीच

जिल्हा सामान्य रुग्णालयातील फिवर क्लिनिक या विभागात संशयित कोविडबाधितही उपचार घेण्यासाठी येतात. परंतु, या ठिकाणी येणारे अनेकजण तोंडाला मास्कच लावत नसल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here