ट्रकचालकाची गळा आवळून केली हत्या! पळविला ट्रकसह १३ लाखांचा मुद्देमाल

समुद्रपूर : तालुक्‍यातील चंद्रपूर-नागपूर मार्गावरील नंदोरी शिवारात अज्ञात चोरट्याने ट्रकचालक दयालसिंग राजू पांडे (३०) याचा गळा आवळून हत्या केली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने मृतकाच्या ताब्यातील ट्रकसह १३ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून घटनास्थळावरून पोबारा केल्याची घटना तक्रारीनंतर उघडकीस आली. या प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदोरी शिवारातील झुडपी जंगल परिसरात अज्ञात व्यक्‍तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. चंद्रपूर येथे अल्ट्रा टेक कंपनीतून सिमेंटची पोती घेऊन ही व्यक्‍ती नागपूरला जात होती. मात्र, त्याचा फोन बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने मृतकाचा भाऊ अमरसिंग राजू पांडे यांनी शोध घेत थेट समुद्रपूर पोलीस स्टेशन गाठले. अशातच पोलिसांनीही एका अजात व्यक्तीचा मृतदेह आम्हाला महामार्गाच्या कडेला सापडला आहे, तो तुमच्या भावाचा आहे काय, याची शहानिशा करण्यास सांगितले. त्यानंतर धक्कादायकच माहिती पुढे आली. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात दयालसिंग याचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध मनुष्यवधासह भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, समुद्रपूरचे ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रामदास खोत करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here