

नागपूर : वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्पात तिसऱ्यांदा अस्वलाचे दुर्मीळ असे ‘ल्युसिस्टिक’ पिल्लू आढळून आले आहे. एक काळे तर एक ‘ल्युसिस्टिक’ पिल्लू चक्क आईच्या पाठीवर बसून बोर व्याघ्रप्रकल्पात भ्रमंती करताना दिसले. वन्यजीव अभ्यासक संजय करकरे यांनी हे दृष्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले. यापूर्वी २०२० मध्ये एक मादी अस्वल एक काळ्या व एक ‘ल्युसिस्टिक’ पिल्लासोबत आढळून आली होती.
यापूर्वी याच व्याघ्रप्रकल्पात १३ मार्च २०२० ला एका मादी अस्वलाच्या पाठीवर बसून एक काळ्या रंगाचे व एक तपकिरी रंगाचे पिल्लू शुभम पाटील या पर्यटकाला जंगल सफारीदरम्यान आढळून आले होते. तसेच २०२० मध्ये चौथ्या टप्प्यातील वन्यप्राणी प्रगणनेदरम्यान बोर व्याघ्रप्रकल्पात लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये २४ मार्च २०२० ला एक मादी अस्वल एक काळ्या व एक तपकिरी रंगाच्या सुमारे तीन ते चार महिने वयाच्या पिल्लांना पाठीवर बसवून वनभ्रमंती करतानाचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये आले होते. दरम्यान, २०२२ मध्ये बोर व्याघ्रप्रकल्पातील वनरक्षक मनेशकुमार सज्जन १९ डिसेंबरला त्यांच्या दुचाकी वाहनाने कळमेट तपासणी नाक्याकडे जात होते. यादरम्यान आमगाव तपासणी नाक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर पोहोचल्यावर वनक्षेत्रातून निघून डांबरी रस्त्यावर येताना त्यांना एक अस्वल दिसले.