सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक संकटात! उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

वर्धा : सोयाबीन कापणीचा हंगाम ऐन तोंडावर आला असताना धो धो पाऊस कोसळत आहे. पाऊस न थांबल्यास सोयाबीनची कापणी कशी करावी. असे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले असून अतिपावसाने खरिपाचा हंगाम धोक्यात आल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

काही दिवसांतच सोयाबीन कापून घरात येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता अशातच सप्टेंबर महिन्यात दमदार पावसाने सुरुवात करत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने मागील महिन्याची तूट पावसाने भरुन काढली परंतु या काळात पाऊस थांबला नसल्याने पाण्याच्या निचऱ्याअभावी शेतामध्ये पाणी साचत आहे. सततच्या पावसामुळे शेतातील सोयाबीन पीक खराब होण्याच्या मार्गावर असून तुरीचे पीक पिवळे तर, कपाशीची परिस्थिती फारच वाईट झाली आहे.

सततच्या पावसाने हिरवी कपाशीची बोंडे सडून शेतात त्यांचा सडा जिकडे तिकडे पाहायला मिळत आहे. ही सर्व भयानक परिस्थिती शेतकरी पाहात असताना हाताशी आलेला खरीप हंगाम हातचा तर जाणार नाही ना?, ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. शंभर दिवस पूर्ण झालेले सोयाबीन पीक आता कापणीला आले आहे.

या काळात सोयाबीन कापणी मळणी करेपर्यंत पाऊस थांबणे गरजेचे असताना जोरदार पाऊस सुरुच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तालुक्यातील ओल्या दुष्काळाच्या सावटात गत पंधरा दिवसापासून तालुक्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने खरीप पिकांना फटका बसला आहे. सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले असून यावर्षी चांगल्या प्रकारे आलेल्या सोयाबीन पिकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here