ले मशाले चल पडे है, लोग मेरे गाव के! अब अंधेरा चिर देंगे लोग मेरे गाव के…

सडेतोड
——–

वर्धा : अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्याशिवाय जीवन जगणे कठीण जाते. माणूस सामाजिक प्राणी म्हणून जगायला लागला तेव्हापासून आरोग्य आणि शिक्षण या दोन गरजा महत्त्वाच्या झाल्या. या गरजांच्या पूर्ततेकरिता माणसं अगदी व्याकूळ होऊन जातात, हे हेरून काहींनी आपल्या विद्वत्तेचे दुकान थाटले आहे. आरोग्यविषयक काही तक्रारी असल्यास खासगी रुग्णालयांसह शासकीय रुग्णालयेही उपलब्ध आहेत. पण इंग्रजीच्या “अंधी दौड”ने कॉन्व्हेंट संस्कृतीला पर्यायच उरलेला नाही. त्यातूनच पालकांचे भयावह दोहन केले जात आहे.
पालक रिक्षाचालक, मजूर, कामगार असो की शेतकरी, निम्नवर्गीय कर्मचारी असो, प्रत्येकाचे एकच स्वप्न असते, ते म्हणजे आपल्या पाल्याला शिकवून खूप मोठ्ठे करायचे. आपण आयुष्यात जे साध्य करू शकलो नाही, ते मुला-मुलीने मिळवावे, हे स्वप्न आई-वडील अहोरात्र पाहत असतात. याच स्वप्नाच्या पूर्ततेकरिता काबाडकष्ट करून जमविलेला पै नि पै पाल्यावर खर्च करण्याची त्यांची तयारी असते. मुलांबद्दल पालक खूप हळवे असतात. या स्पर्धेच्या जगात, धावपळीच्या काळात आपला मुलगा, मुलगी हरवून जाऊ नये. त्यांच्या आयुष्याला चांगले वळण लागावे, याकरिता पालक शक्य ते सर्व करतात.
पालकांच्या या मनोवस्थेचा पुरेपूर अभ्यास असलेल्या कथित संस्थाचालकांनी शिक्षणाच्या नावावर धंदा थाटला आहे. शिक्षणसम्राट, शिक्षणमहर्षी, कैवारी बनलेल्या आधुनिक शिक्षण विक्री दुकानदारांनी सर्व सेवा, वस्तू विक्रीला ठेवल्या आहेत. बरे दुकानात गेल्यावर आपण वस्तू घ्यायच्या की नाही, याचे स्वातंत्र्य असते. पण यांच्याकडे विद्यार्थी, पालक आले की, त्यांना ग्राहक बनवून सुुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सर्व काही ‘कम्पल्सरी’ असते. त्याबद्दल ‘नो एस्क्यूज’ असते. नो चॉईस, ‘नो क्वश्‍चन’ असा हा सर्व प्रकार आहे. या विश्‍लेषणात वारंवार इंग्लिश शब्द येत आहेत. काय करावे “कॉन्व्हेंट्स” म्हटल्यावर तेवढे शब्द तर येणारच.
या जगात पैसे कमावणे अति सोपे आहे आणि अति कठीणही आहे. लाडीलबाडी करून सहज पैसे कमविणाऱ्यांची संख्या कमी नाही़, पण ती दिवसरात्र श्रम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता संघर्ष करणाऱ्या जिवांपेक्षा मोठीही नाही. या मोठ्या वर्गाच्या जगण्याची धडपड, धावपळ कमी करण्याकरिता झटणाऱ्या व्यक्ती, संस्था मोजक्याच आहेत. त्यांच्या जगण्याचा संघर्ष अधिक जीवघेणा करणाऱ्या व्यक्तींचीच संख्या अधिक आहे. आज बहुतांश शिक्षण संस्था हीच अमानवीय भूमिका निभावत आहेत.
बेसुमार शैक्षणिक शुल्क, प्रवेश शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदीतून मिळणारा ४०-५० टक्के नफा, वर्षभरातील उपक्रमांकरिता लादला जाणारा खर्च, स्नेहसंमेलनाच्या नावे घेतले जाणारे पैसे असा वर्षभर पैशांचा पाऊसच पालकांकडून संस्थाचालक आपल्या अंगावर पाडून घेत असतात. ज्यांच्याकडून आपण पैसे उकळत आहोत, ते त्या पैशांची तजवीज कशी करीत असतील, हा संवेदनशील प्रश्‍न कधी त्यांच्या मनमेंदूत डोकावत असेल काय..?
या इंग्रजी शिक्षणाच्या नावाने फोफावलेल्या शाळा आहेत की, शिक्षणाच्या नावाने पालकांची कत्तल करणारे कत्तलखाने आहेत? शासन, न्यायव्यवस्थेचे सर्व निर्णय, आदेश केराच्या टोपलीत टाकून बेदरकारपणे व्यवसाय करणाऱ्या संबंधितांना रोखण्याची कुणातच धमक नाही काय? कधीतरी न्याय-अन्यायाच्या लढाईत पिचलेल्या, पीडित समूहाला न्याय मिळेल काय? शोषणाचा कडेलोट होऊनही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणाऱ्या पालकांना कधीतरी मशाल हाती घेऊन बंड पुकारण्याचे बळ येईल काय…
ले मशाले चल पडे है लोग मेरे गाव के
अब अंधेरा चिर देंगे लोग मेरे गाव के…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here