गावठी बनावटीच्या ‘पिस्टल’ सह दोन जिवंत काडतूसं केली जप्त!

वर्धा : ‘पिस्टल’चा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगारास शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेत सिद्धार्थनगर परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून गावठी बनावटिच्या ‘पिस्टल’सह दोन जिवंत काडतूस जप्त करीत जावेद पठाण विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

जावेद खान मेहबूब खान पठाण, रा. आनंदनगर हा मागील काही दिवसांपासून कंबरेला पिस्टल बांधून गावात फिरत असल्याची माहिती शहर ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी जावेद पठाण याच्यावर पाळत ठेवणे सुरू केले. बुधवारी जावेद पठाण हा बोरगाव मेघे परिसरात ‘पिस्टल’चा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत पसरवीत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली.

त्यानुसार, पोलिसांनी लगेच आपली टीम बोरगाव मेघे परिसराकडे वळविली असता सिद्धार्थनगर परिसरात जावेद धुमाकूळ घालताना दिसून आला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सापळा रचून त्याच्या सभोवताल घेराव घालून जावेदला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी बनावटीची ४० हजार रुपये किमतीची ‘पिस्टल’ आणि २ हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पाटील, सचिन इंगोले, संजय पंचभाई, दीपक जंगले, सुनील मेंढे, राजेंद्र ढगे, श्याम सलामे यांनी केली असून पुढील तपास सलाम कुरेशी हे करीत आहेत.

‘जावेद’वर विविध गंभीर गुन्हे दाखल

जावेद पठाण हा दारुविक्रेता असून त्याच्यावर लूटमार, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या आदी सारख्या विविध गंभीर गुन्हे यापूर्वी देखील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहेत. हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

यापूर्वीही पिस्टल केली होती जप्त

जावेद पठाण याला गुन्हे शोध पथकाने यापूर्वीदेखील पिस्टल बाळगून असताना अटक केली होती. पोलिसांनी त्याच्यावर तीन वर्षांपूर्वी तडीपारीचा प्रस्ताव दाखल केला होता. जावेद हा सुमारे दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपारदेखील होता. गुन्हेगारी जगतात जावेदचे प्रस्थ वाढत चालले असून पोलिसांनी दखल घेत कठोर कारवाई करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here