दारूविक्रीतून उफाळला वाद! चार जणांत झाली ‘फ्रीस्टाईल’; आर्वी नाका परिसरात तणाव

वर्धा : सध्या जवळपास शहरातील सर्वच मोठे दारूविक्रेते ‘अंडरग्राउंड’ झाले असताना शहरातील आर्वी नाका परिसरात असलेल्या झोपडपट्टीत खुलेआम राजरोसपणे दारूविक्री होताना दिसते. अशातच दररोज वादाचे प्रसंगदेखील उद्‌भवतात. सोमवार, १० रोजी रात्रीच्या सुमारास दारूविक्रीच्या कारणातून झालेल्या वादात चार जणांमध्ये ‘फ्रीस्टाईल’ झाली अन्‌ मग काय झोपडपट्टीतील अख्खे नागरिक रस्त्यावर उतरले. काही महिलांनीदेखील हातापायी केली. वेळेवर पोलिस पोहोचल्याने अनुचित घटना घडण्यापासून वाचली. या घटनेने मात्र, आर्वी नाका परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

शहरातील मुख्य समजला जाणाऱ्या आर्वी नाका परिसरात असलेल्या झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात देशी- विदेशीसह गावठी दारूसाठा विक्री केला जातो. पोलिसांनादेखील याबाबत माहिती आहे. मात्र, कारवाई करण्याकडे नेहमीच कानाडोळा केला जातो. सोमवार, १० रोजी रात्रीच्या सुमारास एका दारूविक्रेत्याने दुसऱ्या दारूविक्रेत्वाला तू माझ्या दारूची टीप का दिली, असे म्हणत वाद घालणे सुरू केले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि पाहता पाहता वादाने रौद्ररूप धारण केले. चार दारूविक्रेते आपापसात भिडल्याने झोपडपट्टीतील महिलादेखील रस्त्यावर उतरल्या.

याची माहिती शहर पोलिसांना तसेच ड्यूटीवर असलेल्या पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीही समजण्यास तयार नव्हते. शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी प्रशांत बावणकर काही सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठत वाद सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखा आणि क्राईम इंटेलिजन्स पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जमलेली अर्दी पांगविली. मात्र, असे प्रकार हे नित्याचेच झाले असून, यामुळे सामान्य नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here