दुचाकी चोरांची टोळी पोलिसांच्या गळाला! मुद्देमाल जप्त; बंद घराच्या आवारातून पळविली होती मोटारसायकल

आर्वी : येथील जाजूवाडी भागातील रहिवासी रवींद्र विश्वनाथ टाकळे यांच्या घराच्या आवारातून दुचाकी पळविणाऱ्या दोन चोरट्यांना आर्वी पोलिसांनी अटक केली आहे. विलास विश्वनाथ कानबाले (३६, रा. हनुमान वॉर्ड) अनिल भाऊराव मोहनकर (४०, रा. राणी लक्षमीबाई वॉर्ड, आर्वी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

रवींद्र टाकळे हे मुलाच्या प्रवेशासाठी अहमदनगर येथे कुटुबीयांसोबत गेले होते. याच दरम्यान कुलूपबंद घराच्या आवारातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी (क्र. एमएच ३२ टी ९२१४) चोरून नेली. ही बाब लक्षात येताच रवींद्र यांनी आर्वी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाला गती दिली. दरम्यान, आर्वी पोलिसांच्या चमूने विळास कोनबाळे व अनिल मोहनकर यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

या चोरट्यांकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई आर्वीचे ठाणेदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात चंद्रकांत तावरे, भगवान बावणे, भूषण निघोट, चंद्रशेखर वाढवे, राजू राऊत, मनोज भोमले, संदीप कावरे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here