जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागावर काळोखाचे संकट! पथदिव्यांची होणार बत्तीगुल; न.प.ग्रा.पं.वर ३३.६२ कोटी थकबाकी

वर्धा : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पथदिव्यांना महावितरणकडून विद्युत जोडणी देण्यात आली आहे. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायती, नगरपंचायती तसेच नगरपालिकांकडून सध्या पथदिव्यांचे विद्युत देयक वेळीच अदा करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव आहे.

पथदिव्यांच्या विद्युत देयकापोटी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महावितरणची ३३.६२ कोटींची थकबाकी असून येत्या काही दिवसांत विद्युत जोडणी कापण्याची मोहीम महावितरण राबविणार असल्याने जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागांवर काळोखाची टांगती तलवार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

पथदिव्यांच्या थकीत विद्युत देयकाची रक्कम मोठी असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. थकबाकी वसुलीसाठी संबंधितांशी वारंवार पत्रव्यवहारही सूरू आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपंचायत तसेच नगरपालिकेने वेळीच पथदिव्यांचे थकीत देयक अदा करावे, असे आवाहन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी केले आहे.

वारंवार केला जातोय पत्रव्यवहार

जिल्ह्यात ५२० ग्रामपंचायती, सेलू, समुद्रपूर, कारंजा (घा.) व आष्टी या चार नगरपंचायती तसेच वर्धा, सिंदी (रेल्वे, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी या सहा नगरपरिषद आहेत. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पथदिव्यांचे थकीत विद्युत देयक वेळीच अदा करावे यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांशी वारंवार पत्रव्यवहार केले आहेत. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्था थकीत देयक अदा करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले असल्याचे सांगण्यात आले.

महावितरण राबविणार विशेष मोहीम

पथदिव्यांच्या विद्युत देयकाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या वतीने विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. या मोहीम दरम्यान थकबाकी न भरणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पथदिव्यांची विद्युत जोडणी कापली जाणार आहे. त्यासाठीचा नियोजनबद्ध कार्यक्रम जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी तयार केला असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here