शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड! जिल्हाधिकारी; २४ एप्रिल ते १ मेपर्यंत राबविणार विशेष मोहीम

वर्धा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजमेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी किसान भागीदारी प्राथमिकता हमारी नावाची मोहीम २४ एप्रिल ते १मे या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करण्यात येतील. या मोहिमेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.

राज्यात पी. एम. किसान नोंदणीकृत एकूण ११४.९३ लाख लाभार्थ्यांपैकी ८१.३६ लाख लाभार्थी किसान क्रेडिट कार्डधारक आहेत. राज्यात जवळपास ३३.५७ लाख पी. एम. किसान नोंदणीकृत लाभार्थी हे अद्यापही किसान क्रेडिट कार्डधारक नाहीत. यासाठी २४ एप्रिल राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पी. एम. किसान लाभार्थ्यांना कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात यावी. या विशेष ग्रामसभेत लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज देण्यात येतील. केंद्र शासनाने या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यप्रणाली उपलब्ध करून दिलेली आहे. किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषी, पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य विभाग, आणि जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणांच्या समन्ववाने करावयाची आहे.

या मोहिमेच्या यशासाठी ग्रामस्तरावर सरपंच, ग्रामसेवक, क्रुषिमित्र, तलाठी, कृषी सेवा, बचत गट सखी, कृषी सखी, पशु सखी आदी सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. संबंधित सर्व बँका किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याच्या विहित कार्यपद्धतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत घेऊन १ मेपर्यंत त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करतील, यासाठी जिल्हा अग्रणी बँक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित सर्व बँकांनी योजनेतील लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची आणि त्यांचे पी. एम. किसान योजनेचा लाभ मिळत असलेले बँक खाते आधार आधारीत पेमेंटसाठी अधिकृत करून घेण्याचे निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here