खासगी शाळेतील तरुण मुख्याध्यापकाची आत्महत्या! कठोर निर्णयाचे कारण गुलदस्त्यातच

अल्लीपूर : येथील एन. के. व्ही. शाळेचे मुख्याध्यापक सचिन शेखर भुते, रा. टाकळी (दरणे) यांनी शेतशिवारातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून, सचिन यांनी आत्महत्येसारखा कठोर निर्णय का घेतला हे अद्याप पोलिसांच्या तपासात उलगडलेले नाही. याप्रकरणी अल्लीपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, टाकळी (दरणे) येथील मूळ रहिवासी असलेले सचिन शेखर भुते हे सुमारे मागील पाच वर्षांपासून एन. के. व्ही. शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सेवा देत होते. त्यांच्याकडे वडिलोपार्जित दहा एकर शेती असून, कुटुंबीयांना ते शेती व्यवसायात सहकार्य करीत असत. आई-वडिलांना एकुलता असलेले ३० वर्षीय सचिन हे अविवाहित होते. शुक्रवारी सकाळी सचिन हे कुणालाही न सांगता शेतशिवाराकडे गेले. दरम्यान, त्यांनी शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. माहिती मिळताच अल्लीपूर पोलीस स्टेशनचे जमादार दिनेश बागडी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. पुढील तपास अल्लीपूरचे ठाणेदार सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात अल्लीपूर पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here