गणित, भौतिकशास्त्राला वगळण्याचा निर्णय चुकीचाच

आर्वी : समाजात तसेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात इंजिनियर, डॉक्टर यांना महत्त्वाचे स्थान आहे. ही दोन्ही पदे समाजात प्रतिष्ठेची समजली जातात. दहावी-बारावीच्या गुणांवर प्रवेश प्रक्रिया निश्चित केली जाते. दहावी झाल्यावर तंत्रनिकेतनकडे गेल्यावर थेट द्वितीय वर्षात अभियांत्रिकीला प्रवेश मिळतो. तर बारावी झाल्यावर अभियांत्रिकी शाखेकडे जायचे असल्यास रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित विषयात किती गुण आहे हे पाहिले जाते. गुण कमी असल्यास अभियांत्रिकीसाठी जेईई, एमएससीआयटी परीक्षा देणे अनिवार्य होते.बारावीत गणित, भौतिकशास्त्र विषयात किती गुण आहे हे पाहूनच प्रवेश दिला जात होता. मात्र आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र आणि गणित विषय बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि भौतिकशास्त्र हे गाभा समजले जातात मात्र २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी एआयसीटीई संस्थेने नियमांमध्ये बदल केले. आता संस्थेने १४ विषयांची यादी जाहीर केली असून यापैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के गुणासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या नव्या निर्णयाचे स्वागत काही घटकातून करण्यात येत असले तरीही काही घटकातून यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आता अभियंता म्हणून करिअर करायचे असेल तर बारावीला (पीसीएम) गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय नसले तरी चालणार आहे अशा प्रकारचे नवे धोरण ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोरचा मोठा अडथळा आता दूर झाला असून मोठा दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here