
वर्धा : विद्युत देयक अदा केले नाही म्हणून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना महावितरणने दिलासा देण्यासाठी विलासराव देशमुख अभय योजना कार्यान्वित केली. याच योजनेला आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिणामी, घरगुतीसह उद्योग व व्यावसाविक ग्राहकांना पुनरुज्जीवनाची नव्याने संधी मिळाली आहे.
विलासराव देशमुख अभय योजनेनुसार कायमस्वरूपी विद्युत पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना हप्तेवारी अथवा एकरकमी देयक भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ करण्यात येते. या योजनेत ३१ डिसेंबर २०२१ किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमस्वरूपी विद्युत पुरवठा खंडित केलेले सर्व विगर कषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक पात्र आहेत.
ही योजना सुरुवातीला १ मार्च ते 3१ ऑगस्टपर्यंतच लागू होती. परंतु, ग्राहकांच्या मागणीमुळे या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे एक हजाराहून अधिक विद्युत ग्राहकांनी यापूर्वीच विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ घेतला आहे. तर आता मुदतवाढ मिळाल्याने या संधीचे सोनेच जिल्ह्यातील थकबाकीदारांनी करावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.





















































